रविवार, ११ ऑक्टोबर, २०२६

आले लागवड हंगाम व खत आणि किड रोग व्यवस्थापन याची माहिती

 शेतकरी बांधवांनो आले हे मसाले वर्गीय पिक असुन याच्या लागवडीतुन शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळते. मात्र त्यासाठी त्याला चांगली काळजी घ्यावी लागते. आले लागवडी मध्ये बेण्याची निवड आणि साठवण याला जास्त महत्त्व आहे. त्याच प्रमाणे जमीनीच्या निवडीवरही आले उत्पादनात फरक दिसून येतो. लागवड व खत पाणी व्यवस्थापन आधुनिक पध्दती ने केल्यास आले लागवड नक्कीच फायदेशीर होऊ शकते. 

जमीन निवड: आले पिकांसाठी जमीन तिन्ही प्रकारे चालू शकते. हलकी मध्यम भारी पण निचरा होणारी वरील प्रकारच्या जमीनीत आल्याचे उत्पादन चांगले येऊ शकते. आल्यासाठी निवडलेली जमीन शंभर टक्के निचरा होणारी असावी. 

१. लागवडीचा हंगाम व वेळ : बागायती (पाण्याची सोय असल्यास): एप्रिलच्या मध्यापासून ते मे महिन्याच्या अखेरपर्यंत लागवड पूर्ण करून घ्यावी. एप्रिलमध्ये लागवड केल्यास पावसाळ्यापूर्वी आल्याला चांगल्या मुळ्या फुटतात, पीक जमिनीत स्थिर होते आणि फुटवे जास्त प्रमाणात येतात.

कोरडवाहू किंवा पावसाच्या पाण्यावर: मान्सूनपूर्व पाऊस (मे चा शेवटचा आठवडा) किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड करून घ्यावी.

२. सुधारित जाती : महाराष्ट्रात प्रामुख्याने माहीम या जातीची लागवड केली जाते. याशिवाय रिओ-डी-जानेरो, कालिकत, सुप्रभा, आणि स्थानिक जातींची पण लागवड केली जाते. 

३. बेणे निवड आणि बेणे प्रक्रिया : 

बेण्याची निवड: लागवडीसाठी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात काढलेले व चांगल्या रीतीने साठवलेले बेणे वापरावे. बेणे २५ ते ४५ ग्रॅम वजनाचे, टपोरे आणि फुगलेले डोळे (अंकुर) असणारे असावे. 

बेण्याचे प्रमाण: प्रति हेक्टरी साधारणपणे १८ ते २० क्विंटल (१४०० ते २००० किलो) बेणे लागते. 

बेणे प्रक्रिया (खूप महत्त्वाची): कंदकुज आणि कीड रोखण्यासाठी लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया करणे गरजेचे आहे. यासाठी १० लिटर पाण्यात २० मि.ली. क्विनॉलफॉस (२५ ईसी) आणि १५ ग्रॅम कार्बेन्डाझिम (५०% डब्लू.पी.) मिसळून त्या द्रावणात बेणे १० ते १५ मिनिटे बुडवून मगच लागवड करावी. 

४. लागवड करण्याची पद्धत : आल्याची लागवड प्रामुख्याने रुंद वरंबा (गादी वाफा ) पद्धतीने किंवा सरी-वरंबा पद्धतीने केली जाते. सध्या रुंद वरंबा पद्धत जास्त लोकप्रिय आहे:

रुंद वरंबा पद्धत: १२० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून ६० सें.मी. रुंदीचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्याची उंची २० ते २५ सें.मी. ठेवावी.

लागवडीचे अंतर: दोन ओळींत आणि दोन वेण्यांमध्ये २२.५ सें.मी. x २२.५ सें.मी. किंवा २५ x २५ सें.मी. अंतर ठेवून बेणे ४ ते ५ सें.मी. खोल लावून मातीने व्यवस्थित झाकून घ्यावे. 

खत व्यवस्थापन : आले हे जमीन पोखरून वाढणारे पीक असल्यामुळे याला सेंद्रिय व रासायनिक दोन्ही खतांची मोठी गरज असते.

सेंद्रिय खत (लागवडीपूर्वी): जमीन तयार करताना प्रति एकर १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. सोबत २ क्विंटल निंबोळी पेंड दिल्यास जमिनीतल्या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

रासायनिक खत मात्रा (प्रति एकर):

लागवडीच्या वेळी: ४० किलो नायट्रोजन (नत्र), ३० किलो फॉस्फरस (स्फुरद) आणि ३० किलो पोटॅश (पालाश) द्यावे. (यासाठी साधारणपणे २ बॅग १०:२६:२६ आणि १ बॅग युरिया लागवडीच्या वेळी द्यावा).

लागवडीनंतर १ महिन्याने: २० किलो नायट्रोजन (साधारण १ बॅग युरिया).

लागवडीनंतर २ महिन्याने (भर लावताना): २० किलो नायट्रोजन, १५ किलो फॉस्फरस आणि १५ किलो पोटॅश द्यावे.

सूक्ष्म अन्नद्रव्ये: आल्याची पाने पिवळी पडू नयेत म्हणून लागवडीनंतर २ व ४ महिन्यांनी फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट प्रति एकरी १० किलो या प्रमाणात द्यावे.

पाणी व्यवस्थापन : आल्याच्या पिकाला पाण्याची नियमित पण नियंत्रित गरज असते. जमिनीत पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

पारंपारिक पद्धत (सरी-वरंबा):

उन्हाळ्यात (लागवडीनंतर मान्सून सुरू होईपर्यंत) जमीन आणि हवामानानुसार ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

पावसाळ्यात पाऊस नसल्यास गरजेनुसार पाणी द्यावे. जमिनीत पाणी साचल्यास ते तात्काळ बाहेर काढून द्यावे.

हिवाळ्यात आल्याची वाढ पूर्ण होत येते, त्यामुळे १० ते १५ दिवसांच्या अंतराने हलके पाणी द्यावे. काढणीपूर्वी १५ दिवस पाणी पूर्णपणे बंद करावे.

ठिबक सिंचन पद्धत (Drip Irrigation):

आल्यासाठी ठिबक सिंचन सर्वोत्तम मानले जाते. यामुळे रोज किंवा एक दिवसाआड जमिनीच्या गरजेनुसार (साधारण उन्हाळ्यात रोज २ ते ३ तास आणि हिवाळ्यात १ ते २ तास) पाणी देता येते. तसेच ठिबकद्वारे विद्राव्य खते देणे सोपे जाते.

रोग व कीड व्यवस्थापन :

आले पिकाचे सर्वात जास्त नुकसान कंदकुजव्या आणि कंदमाशीमुळे होते.

अ) मुख्य रोग: कंदकुज किंवा मऊ कुज :

हा बुरशीजन्य रोग असून यामुळे कंद सडतात आणि झाड उपटल्यास सहज हातात येते. त्याला दुर्गंधी येते.

प्रतिबंधात्मक उपाय: लागवडीच्या वेळी वर नमूद केलेली बेणे प्रक्रिया नक्की करावी. शेतात पाणी साचू देऊ नये.

रासायनिक नियंत्रण: रोगाची लक्षणे दिसताच मॅन्कोझेब (२.५ ग्रॅम) किंवा मेटॅलॅक्सिल + मॅन्कोझेब (२ ग्रॅम) प्रति लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या बुंध्याशी आणि वरंब्यावर पंपाने नोझल काढून आळवणी (Drenching) करावी.

ब) मुख्य कीड: कंदमाशी :

ही माशी कंदावर अंडी घालते आणि तिची अळी कंद पोखरून खाते, ज्यामुळे नंतर तिथे बुरशी वाढून कंद सडतो.

नियंत्रण:

निंबोळी पेंडीचा वापर करावा.

कंद उघडे पडले असल्यास त्यावर मातीची भर द्यावी जेणेकरून माशीला अंडी घालता येणार नाही.

प्रादुर्भाव दिसल्यास क्लोरोपायरीफॉस (२ मि.ली.) किंवा क्विनॉलफॉस (२ मि.ली.) प्रति लिटर पाण्यात मिसळून कंदापाशी आळवणी करावी.

क) पानांवरील ठिपके: 

पानांवर लंबगोळ किंवा गोल ठिपके पडतात आणि पाने वाळतात.

नियंत्रण: याच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड (३ ग्रॅम) किंवा कार्बेन्डाझिम (१ ग्रॅम) प्रति लिटर पाण्यात मिसळून पानांवर फवारणी करावी.

काढणी व उत्पादन: ओल्या आल्यासाठी लागवडी नंतर सात ते आठ महिन्यांनी पाने पिवळी पडल्यावर किंवा वाळल्यावर पिक काढणीसाठी योग्य होते. पिकाची पाने ५० टक्के पेक्षा जास्त पिवळी पडुन सुकू लागल्यावर पिक काढणीस तयार झाले असे समजावे. मात्र सुंठ तयार करण्यासाठी पाला वाळुन खाली पडल्यावर म्हणजे २४५ ते २६० दिवसांनी कुदळीने खोडांला इजा न होता काढणी करावी. सुधारीत पध्दतीने लागवड केल्यास हेक्टरी १५० क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनो आयात शुल्क मुदतवाढीमुळे कापसाचे भाव कोसळणार की वाढणार?

 शेतकरी बांधवांनो केंद्र सरकारने कापूस आयातीवरील शुल्कमुक्तीला अजून तरी अधिकृतपणे लेखी मुदतवाढ दिलेली नाही, पण वस्त्रोद्योगाच्या मागणीनंतर स...