शेतकरी बांधवांनो हरभरा (चना) हे रब्बी हंगामातील एक अत्यंत चांगले आणि फायदेशीर कडधान्य पीक आहे. सुधारित तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे वापर करून हरभऱ्याचे भरघोस उत्पादन कशे काढावे लागवडीपासून ते काढणीपर्यंतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे
१. हवामान, जमीन आणि लागवड हंगाम:
हवामान: हरभऱ्याला थंड आणि कोरडे हवामान चांगल्या प्रकारे मानवते.
जमीन: मध्यम ते भारी, उत्तम निचरा होणारी आणि कसदार जमीन चांगली आसते.
पेरणीचा कालावधी:
जिरायती (कोरडवाहू) हरभरा: १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पेरणी पूर्ण करावी.
बागायती हरभरा: २० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत पेरणी करावी.
अंतर: दोन ओळींमध्ये ३० सेमी आणि दोन रोपांमध्ये १० सेमी अंतर ठेवून ५ ते ६ सेमी खोलीवर पेरणी करावी.
२.प्रमुख सुधारित जातींची वैशिष्ट्ये:
विजय (Vijay) :
वैशिष्ट्ये: हे वाण कमी पाण्यात किंवा कोरडवाहू (जिरायती) क्षेत्रासाठी चांगले मानले जाते. याचे दाणे मध्यम आकाराचे आणि तांबूस रंगाचे दिसतात.
कालावधी: ९० ते १०० दिवसांत पीक काढणीस तयार होते.
खासियत: हा वाण पाण्याचा ताण खुप चांगल्या प्रकारे सहन करतो आणि मर रोगास पूर्णपणे प्रतिकारक आहे.
उत्पादन: जिरायतीमध्ये एकरी ५ ते ६ क्विंटल, तर बागायतीमध्ये ८ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळु शकते.
दिग्विजय (Digvijay) :
वैशिष्ट्ये: महात्मा फुले कृषी विद्यापीठाने (राहुरी) विकसित केलेले हे वाण आहे. अतिशय लोकप्रिय आणि बहुगुणी आहे. याचे दाणे विजय वाणापेक्षा आकाराने मोठे आणि आकर्षक असतात.
कालावधी: १०५ ते ११० दिवस.
खासियत: हे वाण जिरायती आणि बागायती अशा दोन्ही पद्धतींसाठी उत्तम आहे. वाढ जोमदार होते आणि घाटे गळण्याचे प्रमाण कमी असते.
उत्पादन: योग्य व्यवस्थापन केल्यास हेक्टरी ३० ते ३५ क्विंटल (एकरी १२ ते १४ क्विंटल) पर्यंत चांगले उत्पादन देऊ शकते.
जॅकी ९२१८
वैशिष्ट्ये: विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय असे हे वाण आहे. याचे दाणे टपोरे, पिवळसर-तांबूस आणि वजनाला जड असतात, त्यामुळे बाजारात चांगला भाव मिळतो.
कालावधी: ९५ ते १०५ दिवस.
खासियत: हे वाण मर रोगाला बळी पडत नाही आणि दाणे टपोरे असल्यामुळे मळणी करताना सुलभता येते.
उत्पादन: एकरी ९ ते ११ क्विंटलपर्यंत सरासरी उत्पादन मिळते.
३. खत व्यवस्थापन :
हरभरा हे हवेतील नत्र शोषून घेणारे पीक असल्यामुळे याला जास्त प्रमाणात नत्राची गरज लागत नाही.
सेंद्रिय खत: पूर्वमशागतीवेळी प्रति हेक्टरी ५ टन चांगले प्रकारे कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.
रासायनिक खत (पेरणीच्या वेळी): प्रति एकरी ४० किलो युरिया आणि ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे; किंवा एकरी ५० किलो डीएपी खत द्यावे.
फवारणी: पीक फुलोऱ्यात असताना उत्पादनात वाढ होण्यासाठी २% युरियाची (२० ग्रॅम प्रति लीटर पाणी) पहिली फवारणी करावी आणि त्यानंतर १५ ते १८ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
४.रोग व कीड व्यवस्थापन :
मर रोग : हा हरभऱ्यावरील मुख्य प्रकारचा रोग आहे. याच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी ट्रायकोडेर्मा व्हिरिडी (४ ग्रॅम प्रति किलो बियाणे) किंवा कार्बेन्डाझिम (२ ग्रॅम प्रति किलो बियाणे) लावून बीजप्रक्रिया करून घ्यावी.
घाटेअळी (Pod Borer): ही अळी पाने आणि घाटे (शेंगा) खाऊन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते.
जैविक नियंत्रण: शेतात प्रति हेक्टरी ५० ते ७० पक्षी थांबे (बर्ड पर्चर्स) उभारावेत, ज्यामुळे पक्षी अळ्या खातात. तसेच सुरवातीला ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
रासायनिक नियंत्रण: अळ्यांचा प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टिन बेंझोएट किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल (कोराजन) या कीटकनाशकांची शिफारशीनुसार फवारणी करावी.
५.पाणी व आंतरमशागत व्यवस्थापन :
तण नियंत्रण: पिकाच्या पहिल्या ३० ते ४५ दिवसांत शेत तणमुक्त ठेवणे गरजेचे आहे. पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी.
पाणी व्यवस्थापन: हरभऱ्याला साधारणपणे दोन किंवा तीन पाण्याचे फेर पुरेसे होतात. पहिले पाणी: पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी (घाटे फुटण्याच्या आधी) आणि दुसरे पाणी: ६० ते ६५ दिवसांनी (घाटे भरताना) द्यावे. (लक्षात ठेवा: पीक फुलोऱ्यात असताना पाणी देणे टाळावे).
६. काढणी आणि उत्पादन :
काढणीची वेळ: हरभऱ्याची पाने पिवळी पडून वाळू लागतात आणि घाटे पूर्ण वाळतात (दाणे कडक होतात), तेव्हा पीक काढणीस तयार झाले असे समजावे.साधारणपणे ८० ते ८५% घाटे परिपक्व झाल्यावर पिकाची कापणी किंवा काढणी करावी.
मळणी व साठवण: काढणीनंतर हरभरा काही दिवस उन्हात वाळवून मळणी यंत्राच्या मदतीने दाणे वेगळे करावेत. साठवणूक करताना दाण्यांमधील दमटपणा (ओलावा) ९ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, जेणेकरून धान्याला कीड किंवा बुरशी लागणार नाही.याची काळजी घ्यावी. माहिती चागंली वाटल्यास किंवा काही अडचण वाटल्यास नक्की कमेट करून सांगा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा